शेवगाव : बालविवाहप्रकरणी मुलीच्या वडिलांची तक्रार दाखल करून, घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या शेवगावच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चाइल्ड लाइन सदस्यांनी शुक्रवारी (दि.२०) अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणी निवेदन दिले आहे.
बावी (ता.शिरुर, जि.बीड) येथील तेरा वर्षीय मुलीचा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील एका वस्तीवरील तीस वर्षीय मुलासोबत विवाह पार पडला आहे. याबाबत चाइल्ड लाइनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, सदस्य प्रवीण कदम यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन बालविवाहास बळी पडलेल्या बालिकेचा शोध घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून, या प्रकरणी निवेदन आहे. चाइल्ड लाइनने दिलेल्या निवेदनात केव्हा, कशी, या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रांचे जावक क्रमांक, दिनांकसह पत्राचे संदर्भ, संस्थेने दिलेल्या पत्रानुसार शेवगाव पोलीस व ग्रामसेवकाने घटनास्थळी जाऊन भेट दिल्यानंतर अहवाल सादर केला होता. त्यावेळी घराला असलेला फोटोसोबत जोडण्यात आला होता. मात्र, यंत्रणेने त्याच वेळी तातडीने शोध घेतला असता, तर हा बालविवाह रोखता आला असता, असे निवेदनात म्हटले आहे.
चाइल्ड लाइनने मुलाच्या वडिलांनी व नातेवाइकांनी हा विवाह सोहळा अज्ञात ठिकाणी गुपचूप उरकून टाकला आहे. या संदर्भात बालविवाह प्रतिबंधक सर्व यंत्रणांना बालविवाह होत असल्याबाबत लक्ष वेधूनही संबंधित शासकीय यंत्रणेने गंभीररीत्या हा विवाह सोहळा रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तसेच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळले व मुलीच्या वडिलांची फिर्याद घेण्यास नकार दिला आदी बाबींमुळे बालविवाह रोखता आला नसल्याचा आरोप चाइल्ड लाइन या संस्थेने केला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी ‘त्या’ मुलीच्या वडिलांना, तसेच चाइल्ड लाइनच्या सदस्याला संपर्क साधून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले आहे, अशी माहिती मुलीच्या वडिलांनी व प्रवीण कदम यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली आहे.