बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीर व बोअरवेलमधून तीन विद्युत मोटारी, केबल, पाईप व कुक्कुटपालनचे साहित्य चोरट्यांनी रविवारी (दि.३१) रात्री लंपास केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
बोधेगाव येथील गोकूळ काकासाहेब घोरतळे (वय ३३) यांची सोनविहीर फाट्यानजीक शेवगाव-गेवराई मार्गालगत गट नंबर ५२७ मध्ये शेतजमीन आहे. या शेतात त्यांनी रब्बी पिकांसोबत फळबाग केलेली आहे. पाण्यासाठी एक विहीर व बोअरवेल आहे. पिकांना पाणी देण्यासाठी गोकूळ घोरतळे यांनी विहिरीत ३ एचपीची १ पाणबुडी मोटार, १ सिंगल फेज मोटार व बोअरवेलमध्ये थ्री-फेज मोटार अशा तीन मोटारी बसवलेल्या होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी विहीर व बोअरवेलमधील विद्युत मोटारी केबल, पाईपसह गायब केल्या. तसेच याच ठिकाणी घोरतळे यांचे एक बंद अवस्थेतील कुक्कुटपालन शेड आहे. त्यातील दोन भारा लोखंडी सळया, केबल व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. रविवारी रात्री शेडमध्ये राखणदार व्यक्ती नसल्याचा फायदा घेत अंदाजे अर्धा-पाऊण लाखांच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे दिसते आहे. सोमवारी (दि.१) सकाळी गोकूळ घोरतळे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, त्यांना सदरील प्रकार निदर्शनास आला. याबाबत गोकूळ घोरतळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली आहे.