पारनेर : गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेले पारनेर तालुक्यातील निघोज येथील दारूबंदीसाठी आता येत्या रविवारी (३१ जुलै) फेरमतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली. दरम्यान, पूर्र्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीत अनागोंदी केल्यानंतर ही निवडणूक आता महसूल विभाग घेणार आहे.रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत मतदान होईल. मतदानादरम्यान मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी प्रभागनिहाय मतदान होणार असल्याचे सागरे यांनी सांगितले. प्रभाग एक व तीन- मळगंगा विद्यालय, प्रभाग दोन- मोरवाडी जि.प.प्राथमिक शाळा, प्रभाग चार- निघोज कुंड जि.प.प्राथमिक शाळा, प्रभाग पाच - वडगाव गुंड- जि. प.प्राथमिक शाळा, प्रभाग सहा - जि.प. प्राथमिक शाळा-तनपुरेवाडी अशा पाच मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानानंतर दुपारी चार वाजता मुलिकादेवी विद्यालयात मतमोजणी होईल. निवडणुकीसाठी महसूलची यंत्रणा उपस्थित राहणार असून निरपेक्ष वातावरणात मतदान होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार असल्याचे सागरे यांनी सांगितले. निघोज येथे पूर्र्वी २७ जानेवारीला मतदान झाले होते. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनागोंदी कारभाराने अनेक महिलांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. त्यानंतर दारूबंदी चळवळीचे प्रमुख न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा पडताळणी केली. या पडताळणीत मतदार मतदानासाठी पात्र ठरल्याने आता पुन्हा मतदान होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
निघोजमधील दारूबंदीसाठी ३१ जुलैला फेरमतदान
By admin | Updated: July 23, 2016 00:09 IST