बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील दारूबंदीसाठी महिला सरसावल्या आहेत. तसा ठराव घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. रविवारी आयोजित ग्रामसभेत हा निर्णय झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजीराव नेमाने होते
चापडगाव येथे बेकायदा दारू व इतर अवैध व्यवसाय जोमात सुरु आहेत. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. दारूमुळे कुटुंबासह गावात तंटे सुरु झाल्याने कायदा व सुव्यवस्था सातत्याने धोक्यात येत असल्याचे सभेत निदर्शनास आणून देण्यात आले. गावातील दारू विक्री बंद करावी, अशी मागणी महिला व ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे करुनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता कायदेशीर लढाई करावी लागेल, असा इशारा सभेत देण्यात आला.
ग्रामसेवक ए आर तळेकर यांनी प्रास्ताविक केले. 'तंटामुक्ती'चे अध्यक्ष पंडितराव नेमाने, ह. भ.प.भरत महाराज, कामगार पोलीस पाटील भरत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सभेस मंगल नेमाने, वंदना पातकळ, कावेरी नेमाने, सुलोचना गायकवाड, शारदा पातकळ, कौश्यला गोरे, मालन लहासे तसेच गावातील महिला मोठय़ा संख्येने हजर होत्या. (वार्ताहर)
■ कोणत्याही परिस्थितीत गावात दारूबंदी झाली पाहिजे, अशी सूचना विमल सोनवणे यांनी केली. त्यास लताबाई जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महिलांनी एकमताने हा ठराव प्राधान्याने हाती घेतला. त्याला उपस्थित महिलांनी पाठिंबा दिला.