नेवासा फाटा : तालुक्यातील कारेगाव ते माळीचिंचोरा हा कालव्याजवळील बंद असलेला शिवरस्ता खुला होण्यासाठी रांजणगाव देवी या भागातील शेतकरी नारायण लक्ष्मण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता वडाळा बहिरोबा येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण तिसऱ्या दिवशीही (शुक्रवारी) सुरूच होते.
प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. तहसीलदार रूपेश सुराणा यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. याबाबत शेतकरी नारायण लक्ष्मण चौधरी म्हणाले, माझ्यासह रांजणगावदेवी येथील नऊ ते दहा शेतकऱ्यांनी मिळून २९ सप्टेंबर २०२० रोजी कारेगाव ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले होते. त्यावेळी मंडळाधिकारी व तलाठी यांनी पूर्व-पश्चिम गटनंबर १२७ व गटनंबर ६३ चे पैसे भरा व मोजणी करून घ्यावी, असे लेखी दिले होते.
त्यानुसार चार शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये मोजणी फी भरली. मोजणी झाली. खुणादेखील करून दिल्या. मात्र त्या शिवेजवळ कालवा आहे. कालवा व शिवेमधील अंतर २५ ते ३० फूट आहे. त्यामुळे इतक्या उंचीवरून शेतीची ऊस वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्याजवळ पूर्व-पश्चिम या दोन्ही बाजूने कालव्याच्या कडेने रस्ता देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. उपोषणामध्ये शेतकरी नारायण चौधरी यांच्या समवेत दीपक अंबाडे, जितेंद्र अंबाडे, लक्ष्मण चौधरी, आसाराम चौधरी, गोरखनाथ वाळुंजकर, हनुमंत वाळुंजकर या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.