पारनेर : केंद्र सरकारविरोधात संयुक्त किसान एकता मोर्चाने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी ‘चक्काजाम’ आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटना ६ फेब्रुवारी रोजी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली.
याबाबतचे निवेदन भूमिपूत्र शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांना देण्यात आले आहे. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख, संतोष कोरडे, सीताराम देठे, सुभाष गायकवाड, संतोष खाडे, रवींद्र साळवे, पोपट दरेकर, शुभम टेकुडे, तेजस भोर, सचिन भोर, सतीश वाडेकर, दीपक गुंजाळ, संतोष केदारी, महेश झावरे आदी उपस्थित होते.