श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना केशव मगर यांनी कधीच बारकाईने लक्ष दिले नाही. आता बेछूट आरोप करीत फिरत आहेत. आमची बापूंच्या पुतळ्यासमोर आमने-सामने येण्याची तयारी आहे. आरोप सिद्ध झाले तर कारखान्याची निवडणूकच लढविणार नाही, असे आव्हान कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी विरोधकांना दिले.
नागवडे साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक संपल्यानंतर शनिवारी दुपारी ते पत्रकारांशी बोलत होते.
नागवडे कारखान्याचे राज्यात आगळेवेगळे नाव आहे. बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्णय होतात. केशव मगर, अण्णासाहेब शेलार आमच्यात मिटींगमध्ये वाद झालेला नाही; मात्र ते बाहेर गेले की आरोप प्रत्यारोप करतात. हे चुकीचे आहे. कारखान्याला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. इथेनॉल को. जनरेशन चालू करणार आहे. कारखान्याची परिस्थिती उत्तम आहे, असे नागवडे यांनी सांगितले.
साखर विक्रीतील घोटाळ्याचे खंडन करताना नागवडे म्हणाले, शिवम एंटरप्रायजेसबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. नंतर थोडे फार रेट वाढले की लगेच विरोधकांनी कोल्हेकुई सुरू केली. कारखान्याचा तोटा होईल असे निर्णय होणार आहोत.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, सुभाष शिंदे, ॲड. सुनील भोस, श्रीनिवास घाडगे, अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, अशोक रोडे, विजय कापसे, प्रशांत गोरे, शरद खोमणे, सुनील माने, हेमंत नलगे, राकेश पाचपुते, बंडोपंत रायकर, शिवाजी जगताप, नीळकंठ जंगले, विश्वनाथ गिरमकर, सचिन कदम, विलास काकडे आदी उपस्थित होते.
----
संचालकांशिवाय ते वीटही खरेदी करत नाहीत..
कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष शिंदे म्हणाले, को जनरेशनचा १३० कोटींचा प्रकल्प ९० कोटींत करण्यात आला. टीका करणारी चांगल्या कारभारात किती भागीदार आहेत हा संशोधनाचा विषय आहे. शरद खोमणे म्हणाले, राजेंद्र नागवडे हे संचालकांना विश्वासात घेतल्याशिवाय साधी एक वीटही खरेदी करत नाहीत.