अहमदनगर : देशातील सराफांना हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विकण्याबाबतची अंमलबजावणी १ जून २०२१ पासून होणार आहे. दरम्यान, सध्या देशामध्ये हॉलमार्क सेंटरची कमतरता असल्यामुळे आणि याबाबत अंमलबजावणी यंत्रणा सरकारकडून तयार नसल्याने ही मुदत आणखी वर्षभरापर्यंत वाढविण्याची मागणी महाराष्ट्रातील सराफांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. गडकरी यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्रव्यवहार करून सराफांच्या मागणीबाबत व कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे सराफांना हॉलमार्क दागिने विकण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारने सराफांना १ जून २०२१ पासून हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक केले आहे. याआधी हॉलमार्कचे सोने विकण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी होती. मात्र, कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अंतिम मुदत वाढविण्यात आली होती. मात्र, पुन्हा कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही मुदत जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे; परंतु अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून केंद्र सरकारकडून सोन्याचे दागिने हॉलमार्क प्रमाणित करून देणाऱ्या सेंटरची संख्या वाढविण्यात आलेली नाही, तसेच काही राज्यांत हे सेंटरही कार्यान्वित झालेले नाहीत, तसेच महाराष्ट्रामध्ये मोजक्या ठिकाणीच हे सेंटर कार्यान्वित आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असतील, तर सराफांना दागिने हॉलमार्क करणे अधिक सोयीचे होईल. मात्र, केंद्र सरकारकडून हॉलमार्क सेंटर्स वाढविण्यात आले नसल्याने सराफांना दागिने हॉलमार्क करणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे सरकारकडूनच यंत्रणा तयार नसल्याने व सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हॉलमार्क दागिने विकण्याबाबत जून -२०२२ म्हणजे वर्षभर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सराफ संघटनांनी, तसेच ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. दरम्यान, गडकरी यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून सराफांच्या मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा सराफ संघटनांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सोन्यातील भेसळ किंवा ग्राहकांची फसवणूक हे प्रकार टाळून सर्वसामान्य ग्राहकांचे हित सांभाळणे हे सरकारच्या हॉलमार्किंगच्या निर्णयामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे सोने व्यापाऱ्यांना सोन्याचा कायदेशीर दर्जा आणि गुणवत्ता राखणे बंधनकारक होणार आहे. यामुळे हॉलमार्कबाबत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सराफ संघटनांनी मंत्री गडकरी यांचे याकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, सराफांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली असून, त्याचा १४ जूनला अंतिम निकाल लागणार आहे, अशी माहिती येथील सराफ व्यावसायिक सागर कायगावकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
-----
आणखी दोन कॅरेटचा समावेश
हॉलमार्कचे बंधन लागू झाल्यानंतर सराफांना १४, १८ आणि २२ कॅरेटच्या हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच विक्री करता येणार आहे. यामध्ये आणखी २३ आणि २४ कॅरेटचा समावेश करावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. त्याचाही उल्लेख गडकरी यांनी केला आहे.