शेवगाव : तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची वेळ वाढवून देण्याची, तसेच कांदा मार्केट सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांनी केली आहे. तहसीलदार अर्चना पागिरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे कृष्णा सातपुते, रोहन वाबळे, संतोष पावशे, अभिजित आहेर, समीर शेख, संतोष जाधव, संकेत वांढेकर आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेनअंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधाचा कालावधी राज्य सरकारने १५ जूनपर्यंत वाढविला आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या शेती व्यवसायाशी निगडित कृषी सेवा केंद्रांना सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची खरिपाची लगबग सुरू झाली आहे. सध्या देण्यात आलेली वेळ अतिशय कमी असल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी सेवा केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. केंद्रासमोरील गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्यास देण्यात आलेली ११ वाजेपर्यंतची निर्धारित वेळ वाढवून यावी.
तसेच बी-बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा विकणे आवश्यक आहे. त्यामुळे कांदा मार्केट सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.