दिलीप चोखर, राहातापावसाच्या लहरीपणावर किंवा सरकारच्या मदतीवर विसंबून न राहाता कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरूण यंत्राच्या सहाय्याने अगदी स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी गावपातळीवर प्रयोग सुरू केले आहेत़ राहात्यातील विरभद्र मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी संयुक्तपणे मंदिराच्या समोरच या शास्त्रीय प्रयोगाला सुरूवात केली़पाऊस पडेपर्यंत हा प्रयोग करण्यात येणार आहे़ गेल्या तीन वर्षांपासून राहात्यात हा उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत वरुण यंत्राचे चांगले फायदे झाले आहेत. स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी गावोगावी हा प्रयोग करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे़कृत्रिम पावसाचे प्रयोग जगभर केले जातात़ चीनसारख्या देशाची तर अर्थव्यवस्थाच यावर अवलंबून आहे़ यात सर्रास केला जाणारा प्रयोग म्हणजे विमानाद्वारे ढगात सिल्व्हर आयोडाईडची फवारणी केली जाते़ यासाठी खास बनवण्यात आलेले रॅकेट लॉन्चर, तोफांचाही वापर करण्यात येतो़ काही वर्षापूर्वी विमानाद्वारे बारामतीतही असा प्रयोग करण्यात आला़ढगामधील पाण्याचे लहान थेंब एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी उत्प्रेरकाची आवश्यकता असते़ कृत्रिम पावसाच्या कोणत्याही प्रयोगात ढगापर्यंत उत्प्रेरक नेले जाते़ मिठाचे कण हे उत्प्रेरकाचे काम करतात़ ढगामध्ये विमानाने फवारणी शक्य नसल्यास जमिनीवर भट्टी पेटवून त्यात मिठाचे कण टाकल्यास ते दोन ते तीन हजार फूट उंचीवर असलेल्या ढगापर्यंत सहजी पोहचू शकतात या तत्वावर हा प्रयोग आधारित आहे़ या प्रयोगासाठी फुलकोबीच्या आकाराच्या काळ्या ढगांची आवश्यकता असते़ मुख्य म्हणजे धूर सरळ वर जाण्यासाठी प्रयोगाच्या वेळी वारे नसावे असेही डॉ़ मराठे यांनी सांगितले़असा आहे प्रयोग वरूण यंत्रासाठी वीटा,जाडे मीठ, लाकूड व वड, उंबर, पळसासारख्या चिक असलेल्या झाडाच्या फांद्याची आवश्यकता असते़ बाजूने हवा लागण्यासाठी विटांचा जाळीदार हौद करून त्यात लाकडे टाकून चांगली आग प्रज्ज्वलीत करतात़ नंतर त्यावर चिकाच्या फांद्या टाकतात़ त्या पेटल्यानंतर त्यावर मग मूठ-मूठ मीठ टाकतात़ हा प्रयोग जवळपास दिड ते दोन तास करतात़ या प्रयोगानंतर ४ ते ७२ तासांत पाऊस सुरू होतो किंवा पडणार असेल तर वाढतो़ आठ ते दहा दिवसांपर्यंतही या प्रयोगाचे फलित दिसू शकते, असा दावा या विषयावर संशोधन करणारे नांदेड येथील संशोधक डॉ़ राजा मराठे यांनी केला़
कृत्रिम पावसासाठी राहात्यात प्रयोग
By admin | Updated: July 17, 2014 00:29 IST