श्रीगोंदा : बाबा, दादा आणि आबा यांच्यामुळे राज्याची कृषी, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली आहे. दोन्ही काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राज्याची भाग्यरेषा बदलणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेलवंडी येथे भाजपाच्या प्रचार सभेत बोलताना दिला.सभेच्या अध्यक्षस्थानी खा.दिलीप गांधी होते. गडकरी पुढे म्हणाले की, शेतीमालाला भाव मिळत नाही. खते महाग झाली आहेत. गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील दरी वाढत आहे. राजकारणात घराणेशाही वाढली. मूठभर नेत्यांची गरिबी हटली मात्र गरिबाची हटली का? हे विदारक चित्र आहे.मोदींमुळे देशात काँग्रेसची दुकानदारी बंद झाली आहे. देशाचे नाव जगात मोठे होऊ लागले आहे. येत्या तीन महिन्यात देशात शेतकऱ्यांच्या इथेनॉलवर बस धावणार आहे. इंधन, गॅस, पेट्रोल निर्मितीतून शेतकऱ्यांना ऊर्जा मिळण्यासाठी धोरण राबविले जाणार आहे. आम्ही जातीयवादी विचारावर राजकारण करीत नाही. माणसाच्या जातीपेक्षा गुणाला महत्त्व देतो. आमचा विरोध आतंकवादी प्रवृत्तीला आहे. आघाडीचे राज्य घोटाळ्यांनी गाजले. राज्याची सत्ता भाजपाकडे द्या, पंचवीस वर्षात झाला नाही एवढा विकास पाच वर्षात करण्याचा आत्मविश्वास देतो.बारामतीपेक्षा सिंचनात श्रीगोंद्याने आघाडी घेतले हे अजित पवारांना खुपले. त्यांनी साकळाईची फाईल माझ्या अंगावर फेकून दिली. आता शरद पवारांनी माझ्या विरोधातील नेत्यांना पदे देऊन मला पाडण्यासाठी रसद पुरविली आहे. माझ्यामुळे राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. मी भाजपात मोठा माणूस झालो आहे, असे उमेदवार बबनराव पाचपुते म्हणाले. यावेळी सदाशिव पाचपुते, दीपक भोसले, अर्जुन बोरूडे, अरुण हिरडे, ज्ञानदेव हिरवे, संजय लगड, बाळासाहेब महाडीक, उमेश कासार, बाळासाहेब नलगे, बाळासाहेब काटे यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा
By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST