भिंगार : स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू पावलेल्या सोनालीच्या नातेवाईकांची पोलिसांनी वाट पाहिली. मात्र तिचे नातेवाईक न आल्याने अखेर पोलिसांनीच दहाव्या दिवशी वारुळाचा मारुती शेजारील दफनभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. सासर माहेरची नातीगोती असतांनाही मृत्युनंतरही तिच्या वाट्याला अनाथाचे भोग वाट्याला आले. ‘मृत्युनंतरही तिची अवहेलना संपेना’ या मथळ्याखालील वृत्त वाचून स्वयंसेवी संस्थाही अंत्यविधीसाठी सरसावल्या. हे वृत्त वाचून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.सोनाली गणेश सोनावणे (वय २०) हिचा स्टोव्ह पेटविताना भडका झाल्याने भाजून मृत्यू झाला होता. तिला उपचाराकरिता एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित रुग्णालय प्रशासनाने या घटनेची कॅम्प पोलिसांना माहिती दिली होती. तात्काळ पोलिसांनी सोनालीचा जबाब घेण्यासाठी हॉस्पिटल गाठले. तिने स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचा जबाब दिला. यात कोणाचा दोष नसल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यानंतर महिलेचा पती गणेश दिनकर सोनावणे याने दुसऱ्या दिवशी विळद येथील एका रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सदर महिलेची सासू रंजना दिनकर सोनवणे हिने सोनालीस जिल्हा रुग्णालयात १७ सप्टेंबर रोजी उपचाराकरिता दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला असता पती व सासू यांनी तेथून पळ काढला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा शोध घेतला, पण त्यांचा शोध लागला नाही. नातेवाईक येतील,या आशेपोटी नऊ दिवस नातेवाईकांची प्रतीक्षा केली. मात्र एकही नातेवाईकही न आल्याने अखेर पोलिसांनाच मयत सोनालीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. (प्रतिनिधी)
अखेर पोलिसांनीच केला ‘तिचा’ दफनविधी
By admin | Updated: September 28, 2014 23:26 IST