अहमदनगर : गेल्या तीन महिन्यांपासून असलेले लॉकडाऊनचे बंधन खुले झाले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम असल्याने कोरोना संदर्भातील नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी सांगितले.
सोमवारपासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्व दुकाने व इतर व्यवहार खुले करण्यात आले आहेत. कोरोनाचे संकट मात्र संपलेले नाही. अशा परिस्थितीत गर्दी न करणे, बाहेर वावरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, लग्न सोहळ्यासारख्या कार्यक्रमात गर्दी न करणे आदी नियमांचे पालन करावे लागणार आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन आस्थापनांना नोटीस बजावून नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देणार आहे. नियमांचे उल्लंघन झाले तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तीन महिन्यांनंतर बहुतांशी दुकाने खुली होत असल्याने गर्दी होणार आहे. त्यामुळे दुकानदार व दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे.
........
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोना संदर्भातील नियमांचे सर्वांनी पालन करणे अनिवार्य आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाच्यावतीने सर्व आस्थापनांना नोटीस बजावण्यात येणार आहे. सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी बिनधास्त न वावरता घराबाहेर पडल्यानंतर नियमांचे पालन करावे.
-विशाल ढुमे, पोलीस उपअधीक्षक, नगर शहर