------------
अहमदनगर: कोरोना काळातही विसापूर जिल्हा कारागृहाने शेती व जोड व्यवसायाच्या माध्यमातून ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे अवघे तेरा कैदी आणि अधिकाऱ्यांनी शेतात राबून हे उत्पन्न काढले आहे. विसापूर कारागृहाची २०० कैद्यांची क्षमता आहे. या कारागृहाकडे एकूण १२९ एकर जमीन आहे. यातील काही जमीन पिकविली जाते. उर्वरित जमिनीत जंगल आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ९० कैदी पॅरोल तर काही संचित रजेवर आहे. त्यामुळे कारागृहात अवघे १३ कैदी आहेत. अशाही परिस्थितीत कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे उत्पन्न घेण्यात आले. गेल्या वर्षभरात येथील शेतीत ऊस, गहू, तूर, ज्वारी आदी पिके घेण्यात आली. शेतीबरोबर कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध व्यवसाय यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही हातभार लागला आहे. कोरोनामुळे कैद्यांची संख्या कमी झाल्याने अधीक्षक जगताप यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शेतात काम करून उत्पादन वाढीला हातभार लावला आहे.
इतर कारागृहांना पाठविला जातो भाजीपाला
विसापूर कारागृहात इतर शेतीपिकांसह भाजीपाल्याचेही उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे कारागृहात बाहेरून भाजीपाला आणावा लागत नाही. तसेच राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक येथील कारागृहांनाही भाजीपाला पाठविला जातो. कोरोनामुळे कारागृहातील मनुष्यबळ कमी झाल्याने यंदा भाजीपाला व्यतिरिक्त इतर शेती पिके घेण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.
------------------
कारागृहात पिकविलेला ऊस हा कारखान्याला विकला जातो तसेच धान्याचीही सरकारी खरेदी केंद्रावर विक्री केली जाते. या माध्यमातून मिळालेले उत्पन्न हे शासनाला पाठविले जाते. विशेष म्हणजे या कारागृहात नैसर्गिक शेती केली जाते. विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या कैद्यांची येथे भरती आहे. सजा भोगत असताना उत्कृष्ट शेती आणि जोड व्यवसाय कसा करावा याचे कौशल्य येथील कैद्यांना प्राप्त होते.
----------------------
कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता-२००
रजेवर असलेले कैदी-९०
सध्या हजर असलेले कैदी- १३
------------------------
कारागृहाच्या शेतीत नियमित अन्नधान्य, ऊस व भाजीपाल्याचे पीक घेतले जाते तसेच इतर जोड व्यवसायही केले जातात. कोरोनामुळे पॅरोल रजा व संचित रजा असे एकूण ९० कैदी रजेवर आहेत. अशाही परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून उत्पन्न घेतले जात आहे. कारागृहातील अधिकारीही शेतात राबतात.
- प्रदीप जगताप, अधीक्षक, खुले जिल्हा कारागृह विसापूर
--------
फोटो- १२ विसापूर जेल