अहमदनगर : जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी विखे-थोरातांची समेट घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्ह्यातील कारखानदारांनी आपापल्या जागा बिनविरोध करत केवळ मला संपवायचे म्हणून निवडणूक लादली. मात्र मतदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने प्रस्थापितांचे मनसुबे धुळीस मिळतील, अशा शब्दात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी कारखानदारांचा खरपूस समाचार घेतला.
जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान संपल्यानंतर कर्डिले यांनी बैठक घेत मतदारांचे आभार मानले व विरोधकांचा समाचार घेतला. कर्डिले म्हणाले, बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात पक्षाच्या वतीने निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माझ्यावर दिली गेली. त्यानंतर मी फडणवीस यांची भेट घेऊन बँक बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सुद्धा त्यास पाठिंबा दिला. त्यानुसार मी खासदार सुजय विखे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क केला. महसूलमंत्री बाळासाहेब यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही बाजूने बिनविरोधसाठी तयारीही झाली; मात्र ऐनवेळी सर्व साखर कारखानदार व प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपापल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली व जागा बिनविरोध केल्या. मात्र माझी जागा बिनविरोध होऊ नये याची काळजी घेतली व ही निवडणूक लादली. परंतु आपल्या पाठीशी सर्व मतदार असल्याने मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखडे, संभाजी लोढे, विष्णू खांदवे, सुरेश शिंदे, बलभीम शेळके, दत्ता पाटील शेळके, विलास शिंदे, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाश घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, वसंत सोनवणे, रेवण चोभे, अशोक झरेकर, नारायण आव्हाड, शिवाजी कार्ले, बन्सी कराळे, संजय ढोणे, अमोल गाडे, मनेष साठे, दिलीप भालसिंग, दत्ता तापकिरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------
... तर कारखान्यांच्या कर्जास विरोध
पूर्वी जिल्हा बँकेचा नफा कारखानदार वाटून घ्यायचे. परंतु ते काम मी बंद केले. आता शेतकऱ्यांपर्यंत नफ्याचे वाटप होेते. नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे दीडशे कोटींचे वाटप केल्यामुळे कारखानदार व प्रस्थापित नाराज झाले. बँकेत मी त्यांना अडसर ठरतो म्हणून कर्डिले संचालक पदावर दिसता कामा नये यासाठी मला संपवण्याचा डाव ते टाकत आहेत. परंतु बँकेत आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कोणी विरोध केल्यास कारखान्यांना कर्ज देण्यास आपला विरोध राहील, असेही कर्डिले यांनी खडसावले.
------------
फोटो - २०कर्डिले सभा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आभार सभेत बोलताना माजी आमदार शिवाजीराव कर्डिले.