अहमदनगर : शहरातील तारकपूर बसस्थानक ते एसटी वर्कशॉप रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पोलीस संरक्षणात ही कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेने सर्जेपुरा ते फलटण पोलीस चौक रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामात रामवाडीतील तारकपूर बसस्थानक ते एसटी वर्कशॉप रस्त्याचाही समावेश आहे. हा रस्ता साडेसात फूट रुंद आहे. परंतु, या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. सर्जेपुरा रस्त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रामवाडीतील रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यापूर्वी या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. या मार्गावरील अतिक्रमित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु, काहींनी घरे खाली केलेली नाहीत. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणे जैसे थे असून, ते लवकरच काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
.....
रामवाडीतून जाणाऱ्या तारकपूर बसस्थानक ते एसटी वर्कशॉप रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, पोलीस संरक्षणात ही कारवाई करण्यात येणार आहे.
- सुरेश इथापे, शहर अभियंता, महापालिका