नेवासा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे व पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्राकडे वाया जाणारे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचा निर्णय मंत्रालयात जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी ‘लोकमत’ला दिली. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट व त्यावरून मराठवाडा व नगर-नाशिक जिल्ह्यात सुरू असलेले पाण्याचे संघर्ष कमी करण्यासाठी हे सर्वेक्षण करावे अशी मागणी आ. गडाख यांनी सोनईत झालेल्या मेळाव्यात केली होती. तेव्हा जलसंपदा मंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता.सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या संघर्षावर हाच एकमेव उपाय असल्याने हे सर्वेक्षण लवकर पूर्ण करावे व या कामाला प्राधान्य व चालना द्यावी अशी मागणी गडाख यांनी केल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.बैठकीत सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. नार-पार, औरंगा, अंबिका, दमणगंगा, वैतरणा, उल्हास आदी खोऱ्यातील संभाव्य जलनिष्पत्ती बाबतही चर्चा झाली. पावसाचे पडणारे प्रचंड पाणी वापराविना पश्चिमेकडे वाहून जाते. ही वस्तुस्थिती असून, त्याचा तुटीच्या क्षेत्रात वापर करावाच लागणार आहे. म्हणून मुळा, प्रवरा बरोबरच संपूर्ण गोदावरी खोऱ्यातील तुटीच्या क्षेत्रात हे पाणी वळविण्याच्या दृष्टीने फेर आढावा घेऊन त्याचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ना.सुनील तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचविले. मुख्य अभियंता कोकण प्रदेश तसेच मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग नाशिक यात समन्वय वाढवून सर्वेक्षणाच्या कामाला गती द्यावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या असे गडाख यांनी सांगितले. बैठकीस आ. गडाख, आमदार चंद्रशेखर घुले, अधिकारी, मुख्य अभियंता हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
समुद्राचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या सर्वेेक्षणाला चालना
By admin | Updated: June 8, 2014 00:36 IST