अहमदनगर: महापालिकेची शहर बस सेवा पूवर्वत होण्याची आशा पुरती मावळली आहे़ अभिकर्ता संस्थेने बस रवाना केल्या असून, बस चालक व वाहकांचे बुधवारी राजीनामे घेतले आहेत़ त्यामुळे बससेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे नाहीत़महापालिकेने ना नफा ना तोटा तत्वावर सेवा सुरू केली होती़ पुणे येथील प्रसन्ना पर्पल मोबीलीटी सोल्यूशन प्रा़ लि़ संस्थेने ही सेवा चालविण्यास घेतली़ अभिकर्ता संस्थेने तोटा होत असल्याचे कारण देऊन महापालिकेकडे भरपाईची मागणी केली होती़ तोटा होत असल्याने बस सेवा सुरू ठेवणे शक्य नाही, असे संबंधित संस्थेचे म्हणणे होते़ परंतु महापालिकेने भरपाई देण्यास नकार दिला़ त्यामुळे यापूर्वी बस सेवा बंद करण्यात आली होती़ मात्र तत्कालीन महापौर शीला शिंदे यांनी भरपाई देण्याची तयारी दर्शविली़ सर्वसाधारण सभेत दरमहा दोन लाख ९८ हजार रुपये भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली होती़ त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली़ ही रक्कम महापालिकेकडून अभिकर्ता संस्थेस दिली जात होती़ मात्र अभिकर्ता संस्थेने १३ जून रोजी तोटा वाढत आहे़ संस्थेचा तोटा २ कोटींच्या घरात पोहोचला आहे़ बस सेवा सुरू ठेवणे अशक्य असून, भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अन्यथा बस सेवा बंद करण्यात येईल,असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले़ प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला़ भरपाई देण्याची करारात तरतूदच नाही़ त्यामुळे भरपाई देणे बेकायदेशीर असल्याचे सांगून स्थायी समितीने वाढीव रक्कम देण्यास सपशेल नकार दिला़ भरपाई न दिल्याने अभिकर्ता संस्थेने गत १६ जून पासून बस सेवा बंद केली़ स्थायी समिती या निर्णयामुळे टीकेची धनी ठरली़ नगरसेवकांनी स्थायीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली़ बस सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी महापौरांकडे केली़ प्रशासनाने अभिकर्ता संस्थेला नोटीस बजावली़ पदाधिकाऱ्यांनी याविषयी बैठका घेऊन संस्थेकडे हात पसरले़ परंतु संस्थेकडून प्रतिसाद मिळाला नसून, अभिकर्ता संस्थेने वाहक व चालकांचे राजीनामेही घेतले आहेत़ त्यामुळे ही सेवा पूर्ववत होण्याची आशा पुरती मावळली असून, बस सेवा पूर्ववत करण्यास महापालिकेला अपयश आले आहे़ त्यामुळे प्रवाशांची पुन्हा परवड सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)८५ कामगारांच्या नोकरीवर गंडांतरशहर बस सेवा पुरविणाऱ्या अभिकर्ता संस्थेत ८५ कामगार कार्यरत होते़ चालक व वाहकांची संख्या मोठी होती़ त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे़ त्यांचा थकीत पगार देऊन राजीनामे घेण्यात आले आहेत़बस सेवा बंद झाल्याने कामगारांवरही घरी बसण्याची वेळ आली आहे़सत्ताधाऱ्यांवर खापरतोट्याचे कारण देऊन युतीच्या काळातही ही सेवा बंद करण्यात आली होती़ मात्र युतीच्या महापौर शिंदे यांनी भरपाई देऊन पुन्हा सेवा सुरू केली़ मात्र तोटा वाढत गेला आणि संस्थेने पुन्हा भरपाई वाढवून मिळण्याची मागणी महापालिकेकडे केली़ मात्र महापालिकेतील स्थायी समितीने भरपाईच बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला़ त्यामुळे अभिकर्ता संस्थेने बस बंद केल्या़ ही सेवा बंद पडल्याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडले जात असून, आघाडीच्या काळात सुरू झालेली बस सेवा त्यांच्याच काळात बंद होत आहे हे विशेष़
प्रसन्नाने घेतले कर्मचाऱ्यांचे राजीनामे
By admin | Updated: June 26, 2014 00:44 IST