लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहर व परिसरातील ओढ्या-नाल्यांचे दगडी बांधकाम करून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अर्थसंकल्पीय सभेत केली, तसेच महापालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पातील शंभर टक्के निधी तत्काळ वितरित करण्याचाही आदेश त्यांनी दिला.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अर्थसंकल्पीय सभा झाली. उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त प्रदीप पठारे, यशवंत डांगे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर आदी उपस्थित होते. यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभापती अविनाश घुले, नगरसेवक कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, श्याम नळकांडे आदी हजर होते. उर्वरित सदस्य ऑनलाइन चर्चेत सहभागी झाले. अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर होता. महासभेच्या मंजुरीनंतरही अर्थसंकल्पातील निधी प्रशासनाकडून वितरीत होत नाहीत. सुरुवातीला ५० आणि वर्षांच्या शेवटी उर्वरित ५० टक्के, असे निधी वितरणाचे दोन टप्पे केले जातात. त्याला फाटा देऊन महापौर वाकळे यांनी शंभर टक्के तत्काळ वितरित करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शंभर टक्के निधी वितरित करण्याची मागणी केली होती. त्यास प्रशासनाने विरोध केला होता. मात्र, वाकळे यांनी प्रशासनाचा विरोध मोडीत काढून संपूर्ण निधी वितरित करण्याचा आदेश दिला. ते म्हणाले, ‘अडवणुकीची भूमिका घेऊ नका. महापालिकेचा कारभार ढेपाळला आहे,’ अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपायुक्तांची नियुक्ती करावी. त्यांचा आढावा घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आली. महापालिकेच्या उत्पन्नवाढीबाबत सूचना करत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील मोबाइल टाॅवरला सरसकट एकसारखी कर आकारणी करण्याची मागणी कुमार वाकळे यांनी केल्या. त्यावर कर आकारणीबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांची १५ दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना वाकळे यांनी केल्या. संपत बारस्कर यांनी सावेडी कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी उभारण्याबाबत काय कार्यवाही झाली, याचा जाब विचारला. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत रवींद्र बारस्कर, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, सुरेखा कदम, मदन आढाव, सभापती अविनाश घुले आदींनी सहभाग घेतला.
.....
मनपाच्या इमारतीत तीन महिन्यांत छत्रपतींचा पुतळा बसविणार
राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी मनपाच्या इमारत परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. यावेळी झालेल्या चर्चेतून महापौर वाकळे यांच्या सूचनेप्रमाणे उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त गोरे यांनीही तातडीने कार्यवाही करणार असल्याचे सभागृहात सांगितले.
........
कॉट्रक्ट ट्रेसिंगसाठी २१ दिवसांनी आले कर्मचारी
नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी कोराना लसीबाबत जनजागृतीची मागणी केली. हाच धागा पकडून कोरोनाबाबत प्रत्यक्षात काम होत नाही. केवळ आकडेवारी जाहीर करून दिशाभूल केली जात आहे. प्रभागातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी महापालिकेत संपर्क केला, परंतु कुणीही आले नाही. थेट २१ दिवसांची कर्मचारी विचारपूस करण्यासाठी आल्याची बाब कुमार वाकळे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
......
कोरोनापेक्षा पाण्याची जास्त भीती
कल्याण रोड परिसरातील पाण्याचा प्रश्न कायम असून, नागरिक दररोज फोन करतात. पिण्याचे पाणी या एका समस्येमुळे सर्वच हैराण झाले असून, कोरोनापेक्षा पिण्याच्या पाण्याची भीती जास्त आहे, अशा शब्दांत श्याम नळकांडे यांनी नाराजी व्यक्त केली.
....
पाणी वितरणाचे नियोजन करण्याची सभापतींची मागणी
शहराला दररोज पाणी देता येईल, एवढे पाणी उपलब्ध होत असून, वितरणाचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. केवळ बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सभापती अविनाश घुले यांनी सभागृहात केली.
.....
बुरुडगाव कचरा डेपोतील वृक्ष लागवडीवरून प्रशासन धारेवर
विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व नगरसेवक कुमार वाकळे यांनी वृक्ष लागवडीचा मुद्दा उपस्थित करत, उद्यान विभागाचे यु.जी. म्हसे यांना चांगलेच धारेवर धरले. बारस्कर म्हणाले, बुरुडगाव येथील एका वृक्षासाठी पालिकेने किती पैसे दिले. त्यावर खुलासा करताना म्हसे म्हणाले, ८०० रुपये दिले. मग बुरुडगाव कचरा डेपो किती उंचीची झाडे लावण्यात आली. यावर म्हसे म्हणाले, ३ ते ४ फुटांची यावर बराच वेळ चर्चा झाली. तेथील झाडे काढून नवीन मोठी झाडे लावण्याची मागणी यावेळी बारस्कर यांनी केली.