अहमदनगर: जिल्हा निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण केली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी शुक्रवार पासून प्रशिक्षण सुरू होत आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसाठी औरंगाबाद येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण होत आहे़ प्रशिक्षणात निवडणुकीविषयीची माहिती दिली जाणार आहे़विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे़ जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मतदान यंत्रणांची तपासणी सुरू आहे़ मतदानासाठी प्रथमच नवीन यंत्रांचा वापर होणार आहे़ जिल्ह्यात एकूण १४ मतदारसंघ आहेत़ प्रत्येक मतदारसंघासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती करण्यात आला आहे़ नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करणे, आचारसंहितेतील नियम, मतमोजणी करताना घ्यावयाची काळजी, याबाबतची माहिती देण्यासाठी दोन दिवसांच्या प्रशिक्षणाचेआयोजन करण्यात आले आहे़ राज्य निवडणूक आयोगाकडून तसे आदेश जिल्हा निवडणूक शाखेस प्राप्त झाले असून, शुक्रवारी औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधनी येथे हे प्रशिक्षण होत आहे़ सकाळ ९ ते सांय. ६ या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे़ नियुक्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक आहे़ नाशिक विभागातील नगरसह धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले़ निवडणूक आयोगाकडून हे आदेश प्राप्त झाले आहेत़ प्रशिक्षणास औरंगाबाद विभागातील जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, आणि हिंगोली जिल्ह्यातील निवडणूक अधिकारीही उपस्थित राहणार आहेत़ प्रशिक्षणात मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रांची माहिती दिली जाणार आहे़ दोन दिवसांच्या प्रशिक्षणात निवडणुकीची माहिती दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक शाखेची लगबग सुरू
By admin | Updated: August 21, 2014 23:05 IST