पाथर्डी : तालुक्यातील एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वर्ग खोल्या मंजूर असताना मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे शाळेचे बांधकाम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी ग्रामस्थांनी या शाळेला कुलूप ठोकले. एकनाथवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. अकरा शिक्षक या शाळेत आहेत. शाळेचा एकूण पट १८७ आहे. सन २०११ साली शाळेला सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वर्ग खोल्यांसाठी ८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. पण तेव्हापासूनच्या मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे बांधकाम आजतागायत सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या धोकदायक वर्ग खोल्यांमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. १९५४ मध्ये बांधकाम झाल्यापासून आजपर्यंत ही शाळा इमारत जशीच्या तशीच आहे. अगोदरच मोडकळीस आलेली ही इमारत आता पडलेल्या पावसामुळे आणखीच धोकादायक बनली आहे. मंगळवारी सकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य देवीदास खेडकर, विष्णू खेडकर, दिलीप खेडकर, बबन माने, भगवान गायकवाड आदींसह गावकऱ्यांनी याच मुददयावरून शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत शाळेचे बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवली जाईल, असा इशारा यावेळी खेडकर यांनी दिला. तसेच २०११ पासून आजतागायत जे मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी कार्यरत होते त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी खेडकर यांनी यावेळी केली. (तालुका प्रतिनिधी)