पाथर्डी : शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तनपूरवाडीजवळील एका ढाब्यासमोर लक्झरी बस व स्कॉर्पीओ जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात स्कार्पीओमधील आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चौघे जण अत्यवस्थ आहेत़ त्यांच्यावर नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात स्कार्पीओ गाडीचा चक्काचूर झाला.रविवारी दुपारी अंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पुणे येथून नांदेडकडे चालली होती़ तर जालना जिल्ह्यातील सोनवणे परिवार पाथर्डी येथे नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होता़ एका मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसने समोरून येणाऱ्या स्कार्पीओला जोराची धडक दिली. यामध्ये स्कार्पीओमधील दुर्गानंद भिकनराव सोनवणे (वय ४३), रंजना सोनवणे, मयुरी सोनवणे, राजश्री सोनवणे, प्रियंका सोनवणे व वैष्णवी सोनवणे, संदीप मोरे व जीप चालक राहुल पांडव हे सर्वजण जखमी झाले़ यामध्ये चौघांची परिस्थिती गंभीर आहे़ अपघात घडल्यानंतर काही वेळातच खरवंडीवरून येत असलेले मिथून डोंगरे, राजीव चेमटे व वाळुंज येथील भाजपचे कार्यकर्ते रणजीत बेळगे यांनी जखमींना जीपमधून बाहेर काढले व खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)
बस अपघातात आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 00:54 IST