अहमदनगर : कोरोनाच्या नैसर्गिक अपत्तीमुळे सर्व समाजघटकांचे मोठे नुकसान झाले असून, येत्या आठ दिवसांत महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीमाफीचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.
घरपट्टी व पाणीपट्टीमाफीसाठी शहर सुधार समितीसह चितळे रोड हॉकर्स युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीटू, लालबावटा विडी कामगार, कामगार संघटना महासंघ, ऑल इंडिया युथ फेडरेशन, भारतीय महिला फेडरेशन पीस फांडेशन, ऊर्जित सोशल फाउंडेशन, रहेमत सुलतान फाउंडेशन, भारतीय जनसंसद आदी संघटनांनी ही चळवळ उभी केली आहे. या संघटनांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महापालिका अधिनियम १९४९ आणि मालमत्ताकराच्या कायद्यातील कलम १३३ अ नुसार नैसर्गिक अपत्ती घरपट्टी व पाणीपट्टी माप करण्याचा महापालिकेला अधिकार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह नगरसेवकांनी या अधिकाराचा वापर करून नागरिकांना दिलासा द्यावा. १२ जुलै १९६१ मध्ये पुणे येथे पानशेत खडकवासला धरण फुटले होते. त्यात पुणे शहर वाहून गेले. त्यावेळी कलम १३३ नुसार पुणेकरांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ केली गेली. कोरोनाच्या नैसर्गिक अपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. काहींच्या घरातील कर्तेपुरुष गेले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगार गेला. शेतकरी, भाजी विक्रेते, सलून व्यावसायिक, रिक्षाचालक- मालक, हातगाडीवाले, फेरीवाले, बांधकाम मजूर, ब्यूटिपार्लर तसेच इतर छोटे-मोठे करणारे देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे सर्व समाजघटकांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून दिवसाला द्यावा, अशी मागणी पत्रकाव्दारे करण्यात आली आहे.