अहमदनगर: उपविभागीय दंडाधिकारी यांच्या तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल भिंगार येथील छावणी मंडळाच्या माजी सदस्या स्मिता सूर्यकांत अष्टेकर यांना तीन महिन्याची साधी कैद, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.नगरचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी १ सप्टेंबर २००८ रोजी एका आदेशान्वये स्मिता अष्टेकर यांना अहमदनगर, बीड, पुणे, नाशिक, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र पोलिसांना अष्टेकर या २१ आॅक्टोबर २००८ रोजी नगर-पुणे रोडवर आढळून आल्या होत्या. पुणे रोडवर सक्कर चौकात यश पॅलेसकडून चाणक्य चौकाकडे त्या एका वाहनाद्वारे जात होत्या. त्या स्वत: गाडी चालवित असल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांनी त्यांना आडविले. यावेळी प्रांताधिकारी यांचा तडीपारीचा आदेश त्यांना दाखवून त्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सहायक सरकारी वकील सचिन सूर्यवंशी आणि विशेष सहायक सरकारी अभियोक्ता एम.डी. पवार यांनी पाच साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अष्टेकर यांना दोषी धरण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.ए. गायकवाड यांनी अष्टेकर यांना तीन महिने साधी कैद, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली.(प्रतिनिधी)
स्मिता अष्टेकरला शिक्षा
By admin | Updated: September 30, 2014 23:21 IST