अहमदनगर : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शहर सहकारी बँकेचे संस्थापक-संचालक प्रा. मुकुंद रामचंद्र घैसास (वय ७९) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. घैसास यांच्या निधनाने नगर शहरावर शोककळा पसरली. शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.श्वसन व मूत्र पिंडाच्या आजाराने प्रा. घैसास यांच्यावर पंधरा दिवसांपासून नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आणि शहर शोकसागरात बुडाले. पेमराज सारडा महाविद्यालयात कॉमर्स विषयाचे प्राध्यापक असलेल्या प्रा. घैसास यांनी एम. ए. (अर्थशास्त्र), एम. कॉम. आयसीएडब्ल्यू, एलएलबी या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेतले. याच ज्ञानाच्या बळावर १९६५ साली स्वत:ची इन्स्टीट्यूट आॅफ कॉमर्स या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत त्यांनी कॉमर्स शाखेतील विविध विषयांचे कोचिंग क्लासेस सन २००० पर्यंत चालविले. १९७४ मध्ये कोर्ट गल्ली भागातून तर १९९१ मध्ये सावेडी भागातून ते तत्कालीन नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. सहकारी बँका, पतसंस्था यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशदा, वैकुंठभाई मेहता, गोवा राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, गुजरात फेडरेशन अशा संस्थांमध्ये त्यांनी वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले आहे. गोवा, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल येथे प्रशिक्षण सत्रात नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाबाबतची अनेक व्याख्याने त्यांनी दिली. सामाजिक कार्यात पक्षविरहित राहून सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा त्यांच्या अंगी होती. त्यामुळेच त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली आणि त्यात ते विजयी झाले.१ जुलै १९७१ रोजी त्यांनी शहर सहकारी बँकेची स्थापना केली. अतिशय मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर त्यांनी शहर सहकारी बँकेला अव्वल दर्जा मिळवून दिला. मर्यादित भांडवल असूनही बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या बळावर ४४ वर्षे त्यांनी शहर सहकारी बँकेची घौडदौड कायम ठेवली. बँकींग क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांच्या मागे पत्नी भारती, मुले डॉ. धनंजय, रवीकिरण आणि सी. ए. गिरीश घैसास, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)भूषविलेली पदेप्रा. घैसास यांनी सहकारी बँकींग क्षेत्रातील विविध समित्यांवर पदे भूषविली. महाराष्ट्र नागरी बँक फेडरेशन (मुंबई)चे अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-आॅप. बँक्स असोसिएशन लि. मुंबईचे संचालक, अहमदनगर शहर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक, रिझर्व्ह बँकेच्या वर्किंग ग्रुपचे सदस्य, नागरी बँकांचे आयटी सपोर्ट वर्किंग ग्रुपचे सदस्य, महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या वित्त आयोगाचे सदस्य, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थास पुणे आणि यशदा येथे ते पाहुणे व्याख्याते म्हणून होते. गुजरात, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या प्रदेशातील नागरी बँक असोसिएशनमध्येही त्यांनी व्याख्याने दिली. नगरपालिकेत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
अर्थतज्ज्ञ मुकुंद घैसास यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 23:43 IST