सलग दुसऱ्या ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या या संस्कार वर्गातून ४३ देशांतील २ लाख ६७ हजारांहून अधिक मुलांपर्यंत संस्कारांची गंगोत्री पोहोचली आहे. यावर्षीच्या उपक्रमात जवळपास एक हजार शाळांसह १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत नोंदणी केली असून १६ मे पासून सुरी झालेला हा उपक्रम ३ मे पर्यंत चालणार आहे. गीता परिवाराच्या या उपक्रमात अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठन, विप्र फाउंडेशन व वनबंधू परिषद या संस्थांचा सहयोग लाभला आहे. लॉकडाऊनमुळे चंचलता हा स्थायीभाव असलेल्या मुलांचे जीवन अतिशय कंटाळवाणे झाल्यासारखी स्थिती आहे. शाळा बंद, मित्र-मैत्रिणींची भेट नाही, धम्मालमस्ती नाही. सारखे घरातच राहून मुलांचा स्वभावही बदलत आहे. त्यावर उपाय म्हणून गीता परिवाराने गेल्यावर्षी पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी दरवर्षीच्या उन्हाळी वर्गांचे स्वरूप बदलून ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘ई संस्कार वाटिका’ हा उपक्रम नि:शुल्क सुरू केला. व्हॉट्सअॅप या सोशल प्लॅटफॉर्मवर ‘ई संस्कार वाटिका’ नावाने साडेपाचशे समूह तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे नोंदणी करून सहभागी झालेल्या मुलांना दररोज सात व्हिडिओ पाठविले जातात. त्यात नित्य प्रार्थना, स्वामी गोविंददेव गिरिजी यांचे ‘सद्गुणों की साधना, डॉ. संजय मालपाणी यांचे ‘जानो गीता-बनो विजेता, कथाकथन सदरात ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या संतांच्या चरित्र कथा, रेखा मुंदडा यांच्या प्रेरणादायक बालनायकांच्या कथा, सुवर्णा मालपाणी यांच्याकडून महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठण शिकवले जाते. योगप्रशिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचे विविध प्रकार, तर सोलापूरच्या संगीता जाधव व भुवनेश्वरी जाधव या यौगिक व्यायामाच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण देत आहेत. विशेष उपक्रम या सदरात ‘आपले सण व उत्सव’ या विषयी अंजली तापडिया विविध सणांचे महत्त्व याबाबत विस्तृत माहितीही देतात.
‘ई संस्कार वाटिका’ उपक्रम आनंदासह संस्कारांचे सिंचन करणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST