शिर्डी : वैद्यकीय क्षेत्रातील सेवावृत्ती संपुष्टात येत चालली असून बाजारीकरणाची कास धरल्यानेच देशात आजही दरवर्षी वैद्यकीय सेवांच्या अभावाने सुमारे चार ते सहा कोटी लोक मृत्यूमुखी पडत आहेत. याचे डॉक्टरांनी चिंतन करावे, असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.वैद्यकीय क्षेत्र हे मंदिर समजून या मंदिरातील पुजारी बनून डॉक्टरांनी ऋग्णसेवेचे व्रत हाती घेण्याची गरजही डॉ़ बंग यांनी व्यक्त केली़ साईबाबा रूग्णालय व शिर्डी, राहाता येथील आय.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर्स डे च्या कार्यक्रमात डॉ.अभय बंग बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदिप आहेर, नगराध्यक्षा अनिता जगताप, उपनगराध्यक्ष निलेश कोते, नगरसेवक शिवाजी गोंदकर, साईबाबा रूग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय पाटील उपस्थित होते.सध्या वैद्यकीय विज्ञान वेगाने पुढे जात आहे. पण हे विज्ञान गरीब रूग्णांपर्यत जाते का याचा कोण विचार करणार आहे. आरोग्याच्या विज्ञानाला बाजारीकरणातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान ग्रामीण भागातील डॉक्टरांपुढे आहे. स्वार्थासाठी लोक जनतेलाही वेठीस धरू लागले आहेत. याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना रूग्णसेवेचा विसर पडू लागला आहे. रूग्ण हा देव न समजता त्याला क्लायंट म्हणून बघितले जावू लागल्याने या क्षेत्रचा तो मोठा पराभव असल्याचे मी समजतो.वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी मुल्यांची जपवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ़ बंग यांनी सांगितले़साईबाबा संस्थानच्या माध्यमातून सामान्य व गरीब मानसाला जी आरोग्य सेवा पुरवली जाते, ती इतर धार्मिक देवस्थानांसाठी आदर्शवत आहे. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेले रूग्ण सेवेचे काम आज शंभर वर्ष सुरू आहे. राज्यात अनेक देवस्थाने गर्भश्रीमंत आहेत.त्यांनी निदान शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर आरोग्यसेवेचा वसा हाती घेतल्यास गोरगरीब लोक या सेवेपासून वंचित राहणार नाही.यावेळी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, डॉ. विजय पाटील यांची भाषणे झाली. साईबाबा रूग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचाही सत्कार डॉ. बंग यांच्या हस्ते करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
उपचाराअभावी मृत्यू वाढले
By admin | Updated: July 5, 2016 23:57 IST