पाथर्डी : श्री क्षेत्र मढी देवस्थानातील विश्वस्ताला कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याबाबतची फिर्याद विश्वस्त अण्णासाहेब देवराम मरकड यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा देवस्थानचे कर्मचारी राजेंद्र दत्तात्रय मरकड यांच्याविद्ध दाखल केला आहे. देवस्थानच्या सात विश्वस्तांनी कर्मचारी मरकड अरेरावीची भाषा करत असून यामुळे आमच्या जीवितास धोका आहे, असा अर्ज पोलीस स्टेशनला दिला आहे. या घटनेमुळे मढी देवस्थानमध्ये पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, देवस्थानची लाईट बंद झाल्याने विश्वस्त मरकड यांनी दुरुस्तीसाठी कर्मचारी राजेंद्र मरकड याला बोलावले. याचा राग आल्याने कर्मचारी मरकड याने शिवीगाळ करीत दमदाटी करून मारहाण केली असल्याची फिर्याद विश्वस्त मरकड यांनी दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीवरून कर्मचारी मरकड याच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी करत मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्यासह सात विश्वस्तांनी संबंधीत कर्मचारी हा अरेरावीची भाषा वापरत असल्याने त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याचा अर्ज पोलिसांना दिला आहे. पुढील तपास हवालदार एम. बऱ्हाटे करत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
‘मढी’ च्या विश्वस्ताला कर्मचाऱ्यांकडून मारहाण
By admin | Updated: June 11, 2016 23:45 IST