कर्जत : चोरी रोखण्यासाठी पोलिसांकडून तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत नागरिकांना फोन कॉल करून याबाबत माहिती दिली जाते. तरीही नागरिकांकडून सतर्कता दाखविली जात नाही. दुर्लक्ष केल्यामुळे चोरी-घरफोडीच्या घटना घडतात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा सक्षमपणे वापर करावा व गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला असेल किंवा गुन्हेगार गुन्हा करण्याच्या तयारीत असतील तर तेथील नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत केलेल्या एकाच फोन कॉलवर शेकडो तरुण तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. आग लागली, चोरी-घरफोडी झाली, मूल हरवले, वाहन चोरीला गेले, अपघात झाला, हल्ला झाला अशा कोणत्याही आपत्तीवेळी नागरिकांनी मदत मागितल्यास त्याच परिसरातील शेकडो नागरिक काही क्षणांत मदतीस येतात. त्यामुळे होणारी विपरीत घटना रोखता येते. यामुळेच तालुक्यातील चांदे बुद्रूक येथे लागलेली मोठी आग असेल, कर्जत पेट्रोल पंपावर पडलेला दरोडा असेल अशा घटनांवर यशस्वी नियंत्रण मिळविता आले. अनेक मोठ्या घटना या यंत्रणेमुळे टळल्या आहेत. मात्र, अद्यापही काही नागरिक या यंत्रणेने दिलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात, असे यादव यांनी म्हटले.