लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.
नेवासाचे माजी आमदार मुरकुटे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीस दत्तात्रय काळे, अण्णासाहेब गव्हाणे, अंकुश काळे, भाऊसाहेब फुलारी, राजेंद्र मते, कैलास म्हस्के, कैलास दहातोंडे, रामचंद्र कदम, आबासाहेब लंवाडे, महेश निकम, अरुण गरड, दत्तात्रय वाघचौरे, देवेंद्र काळे, राजेंद्र पेहरे, अमोल वाघचौरे, सुरेश डिके दत्तात्रय निकम आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. भाजपाचे माजी आमदार मुरुकुटे यांनी सर्व २१ जागांवर उमेदवार दिले होते. परंतु, छाननीत अर्ज बाद झाल्याने चार जणांचे अर्ज राहिले आहेत. याबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी मुरकुटे यांच्या दवभागाव येथील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत ज्ञानेश्वरची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. कारखाना व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. जाचक अटी टाकून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. कारखान्याचे हे धोरण चुकीचे असून, त्याविरोधात निवडणूक लढविण्याचे बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात आले.
...
- उस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी व सभासदांवर होत असलेल्या अन्याविरोधात आवाज उठविण्यासाठी ज्ञानेश्वरवर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविली जाणार आहे.
- बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार, नेवासा