घारगाव : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावरगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मत:च दिव्यांग असून ते संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी सर्वोच्च कळसुबाई शिखर नुकतेच सर केले.दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५ हजार ४०० फूट प्रवास करीत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.
माधव सोनवणे यांचा विवाह सिंधुबाई मोरे यांच्याशी १९८९ साली झाला. सिंधुबाई या डोळस असूनही त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीला आधार देत आपला संसार थाटला. त्या शासकीय आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतात. या दाम्पत्याला तीन मुले असून हे सर्वजण उच्चशिक्षित आहेत. यातील दोघे अभियंते तर एक जण फायन्सास कंपनीत नोकरीला आहे. कळसुबाई शिखर सर करण्याची वडिलांची इच्छा या मुलांनी पूर्ण केल्याने आणि कळसुबाई शिखर सर केल्याने माधव सोनवणे हे आपले जीवन सार्थक झाल्याचे सांगतात.
सोमवारी (दि. ७) सकाळी नऊ वाजता सोनवणे यांचा शिखर सर करण्याचा प्रवास सुरू झाला. पत्नी सिंधुबाई, मुले प्रथमेश, ऋषिकेश,अविनाश यांच्या मदतीने ते मुख्य वाटेला लागले. पुणे, नाशिक येथील बरेच पर्यटक तिथे आले होते. सोनवणे हे एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडी मार्गापर्यंत पोहोचले. तोल सावरत, कधी मुलांचा हात पकडत त्यांनी शिखर सर केले. वाटेत भेटलेल्या प्रत्येकांने त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छाही दिल्या.
...........
चार वाजता परतीचा प्रवास
१३५० मीटर अंतर पार केल्यानंतर ते एका झाडाखाली विसावले. तिथे पाणी पिल्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांनी १६४० मीटर उंचीचे ( ५ हजार ४०० फूट) उंचीचे शिखर सर केले. परतीचा प्रवासही तसाच झाला. दुपारी साडेचार वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. सायंकाळी आठ वाजता ते शिखरावरून खाली उतरले. कळसूमातेच्या दर्शनाची आस व जिद्दीने शिखर सर केल्याचा सोनवणे यांना आनंद झाला. हे शिखर सर करताना आपण दिव्यांग आहोत, हे विसरून गेल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
----------
फोटो नेम : ११ माधव सोनवणे
ओळ : दिव्यांग असलेल्या माधव पंढरीनाथ सोनवणे यांनी कळसुबाई शिखर सर केले.