अहमदनगर : जिल्ह्यात मिशन ऑक्सिजन स्वावलंबन ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हास्तरीय ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यासाठी २३० मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. पूर्वीचे १४ व आता नवे ३ असे एकूण १७ ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढणार असून ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी मिशन ऑक्सिजन स्वावलंबन ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत संभाव्य ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २३० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. ही उपलब्धता तीन दिवस राहील, असे नियोजन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जिल्हा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा आराखडा शासनाला पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २३० मेट्रिक टन ऑक्सिजनमध्ये ७० टक्के लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असणार आहे, २० टक्के सिलिंडर राहणार आहेत, तर १० टक्के ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये ६ ठिकाणी मशिनरी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात उर्वरित ११ ठिकाणी मशिनरी बसविण्याचे काम पूर्ण होईल. आधी १४ प्रकल्प होते, त्यात ३ प्रकल्पांची वाढ करण्यात आली आहे.
---
खासगी रुग्णालयांना ५० टक्के ऑक्सिजन
जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या २३० मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी ५० टक्के ऑक्सिजन खासगी रुग्णालयांना व ५० टक्के ऑक्सिजन शासकीय रुग्णालयांना देण्यात येणार आहे. ज्या खासगी रुग्णालयांनी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट केलेले आहे, अशाच रुग्णालयांना ऑक्सिजनची साठवणूक करण्याची परवानगी दिली जाणार आहे. ऑक्सिजनची यंत्रणा हाताळण्यासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांची मॉनिटरिंग टीम कार्यरत करण्यात येणार आहे.
----------
ऑक्सिजन साठवणूक क्षमता
सध्या जिल्ह्यातच २२९ मेट्रिक टन ऑक्सिजन साठविण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालय व शहरातील इतर खासगी हॉस्पिटल मिळून ८४ मेट्रिक टन इतकी क्षमता आहे. महापालिकेला २० के. एल. ऑक्सिजन साठवणूक करण्याबाबत सांगण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाला आणखी २० के. एल. साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांनीही निर्मिती प्रकल्पांशी करार करून त्यांच्याकडे ऑक्सिजनची साठवणूक करायची आहे. त्यासाठी त्यांनी ड्युरा सिलिंडर, जम्बो सिलिंडर विकत घेणे आवश्यक आहेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.