अहमदनगर / अकोले : शेतकऱ्याकडून तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेताना राहाता येथील मंडलाधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. तर अकोले येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस नाईक संदीप भाऊसाहेब पांडे हा पाच हजारांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला.
राहाता येथील तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी मुंडला अधिकारी भालेकर याने तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील २ लाख रुपये तत्काळ व उर्वरित १ लाख रुपये आठ दिवसांनी द्यावेत, अशी त्याची मागणी होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार देण्यात आली होती. मंगळवारी पथकाने राहाता येथे सापळा लावून भालेकर याला तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच घेताना पंच, साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडले. नाशिक पथकातील पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्यासह पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अकोले येथील घटनेत तक्रारदाराचे साडू व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपींविरुद्ध चॅप्टर केस दाखल करून त्यांचा लगेच जामीन करून देणे व त्यातील उर्वरित एका आरोपीविरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस नाईक पांडे याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अकोले पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक पांडे यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक करांडे, हरीश खेडकर यांनी ही कारवाई केली.