अहमदनगर : संपूर्ण देशभर एकच जीएसटी करप्रणाली पुढील आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हानिहाय मदत केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी रविवारी नगर येथे केली़जीएसटी कर प्रणालीविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ खासदार दिलीप गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम आदी यावेळी उपस्थित होते़ ते पुढे म्हणाले, देशभरातील चार राज्यांनी जीएसटीला विरोध केला होता़ मात्र त्यांचाही विरोध मावळला असून, चारही राज्यांनी जीएसटीला मंजुरी दिली आहे़ त्यामुळे ही कर प्रणाली लागू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ येत्या १ एप्रिलपासून हा कर देशभर लागू करण्यात येणार आहे़ राज्यातील वेगवेगळ्या कर प्रणाली बंद होऊन देशभर एकच कर वसूल केला जाणार आहे़ यामध्ये शेती उत्पादने वगळण्यात आली असून चैनीच्या वस्तुंवर हा कर वसूल केला जाणार आहे़, असे ते म्हणाले़नवीन कर प्रणालीमुळे व्यापाऱ्यांवरील कराचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे़ देशाचे उत्पन्न वाढणार आहे़ परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मेघवाल यांनी यावेळी सांगितले़ जीएसटी कराबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी काही सूचना केल्या़ त्यावर प्रत्येक जिल्ह्यात जीएसटी कर भरण्याबाबत माहिती देण्यासाठी केंद्र स्थापन केले जाईल़ या केंद्रात व्यापाऱ्यांकडून फॉर्म भरून घेतले जातील़ तसेच कराबाबत व्यापाऱ्यांना माहिती दिली जाणार असून, हा कर भरणे अत्यंत सुलभ होणार असल्याचेही यावेळी मेघवाल यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
जीएसटीसाठी जिल्हानिहाय मदत केंद्र
By admin | Updated: November 7, 2016 00:57 IST