मागील वर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर पुण्या-मुंबईसह इतर मोठ्या शहरातील लोक गावाकडे स्थलांतरित झाले. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने ग्रामपंचायतीमार्फत या लोकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे उपलब्ध करून दिली. गेल्या आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यातील १३११ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची विविध कामे सुरू होती. त्यापोटी ७२ कोटी ४९ लाख रुपये खर्च झाले. त्यात ६० टक्के रक्कम मजुरांच्या रोजगारावर, तर इतर रक्कम संबंधित कामांच्या इतर बाबींसाठी खर्च झाली.
लॉकडाऊनमध्ये इतर कामे बंद असली तरी प्रामुख्याने वैयक्तिक लाभाची कामे सुरू होती. त्यामध्ये घरकुले, शोषखड्डे तयार करणे, शौचालय बांधणे, फळबागांची लागवड, निगराणी अशा कामांचा समावेश होता.
चालू आर्थिक वर्षातही जिल्ह्यातील १२०२ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमीची कामे सुरू झाली आहेत. सध्या त्यावर नऊ हजार मजूर काम करीत आहेत. याच महिन्यात लॉकडाऊन उघडल्याने हळूहळू कामांवर मजुरांची संख्या वाढत आहे.
-----------
२०२०-२१ मध्ये रोहयोवर तालुकानिहाय झालेला खर्च
तालुका ग्रामपंचायत संख्या झालेला खर्च (कोटीत)
अकोले. १४६ ३.६२
जामखेड ५८ ६.८४
कर्जत ९१ ८.९५
कोपरगाव. ७५ २.८६
नगर. १०५ ४.४८
नेवासा ११४ ५.७८
पारनेर. ११३ ८.९०
पाथर्डी १०७ ५.८२
राहाता ५० ३.४५
राहुरी. ८२ २.९३
संगमनेर. १४१ ५.३३
शेवगाव. ९३ ४.७२
श्रीगोंदा ८४ ५.६५
श्रीरामपूर. ५२ ३.०८
----------
मागील वर्षभरात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू होती. चालू आर्थिक वर्षातही मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर आता मजुरांची संख्या वाढत आहे.
- जी. के. वेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो, जिल्हा परिषद
--------
गावात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर या कामांना आणखी गती येत असून, जास्तीत जास्त मजुरांना कामे उपलब्ध होतील.
- मनोज कोकाटे, सरपंच, चिचोंडी पाटील
----------
लॉकडाऊनमध्ये रोजगार हमीच्या कामांनी चांगला आधार दिला. सर्व व्यवहार बंद असतानाही रोजगार हमीची कामे सुरू होती. त्यामुळे काही का होईना आमची रोजीरोटी सुरू राहिली.
- प्रल्हाद रासकर, रोहयो मजूर
----------