अहमदनगर: प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीच्या सभेत गत चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीत बदल सुचविण्याबरोबरच चर्चेदरम्यान स्थायी समिती अन्य विषयाचा अहवाल मागवित आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरील चर्चा दुसरीकडेच भरकटत आहे. अर्थसंकल्पीय सभेत अजेंड्यावरील विषयावरच चर्चा करावी असा मतप्रवाह आता पुढे येऊ लागला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची सभा सुरू आहे. मात्र स्थायी समितीत अर्थसंकल्पाशिवाय अन्य विषयावर चर्चा सुरू होऊन सभा लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पीय सभेत तरतुदीवर चर्चा करून त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे. स्थायीने सुचविलेल्या शिफारसीसह अंदाजपत्रक महासभेत जाईल. तेथून ते अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे येईल. समितीच्या सभेत सुधारणा केला जात असल्या तरी सभा मात्र अन्यत्र भरकटत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून एखाद्या कामाचा अहवाल मागविणे या सभेत अभिप्रेत नाही. असे अहवाल मागविणे त्यावर चर्चा करणे यासाठी स्वतंत्र सभा बोलविणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पाशिवाय चर्चा सुरू असल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पीय सभा इतक्या दिवस सुरू राहिली. आणखी किती दिवस सभा सुरू राहिल याची निश्चिती नाही. (प्रतिनिधी) अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना ओघात समोर येणार्या मुद्यांची माहिती (अहवाल) मागविला जात आहे. स्थायीच्या यापूर्वी झालेल्या सभेत अजेंड्यावर नसलेल्या अनेक विषयावर चर्चा झाली आहे. यावर कोणाचा आक्षेप असेल तर शॉर्टनोटीस काढून विविध विषयांच्या चर्चेसाठी विशेष सभा बोलविण्याचा अधिकार सभापतीला आहे. -किशोर डागवाले, सभापती, स्थायी समिती
अर्थसंकल्पावरील चर्चा भरकटली
By admin | Updated: May 25, 2014 00:33 IST