अहमदनगर: टंचाई आढावा बैठकीच्या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळेआधी हजेरी लावत जिल्हाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा केली़ त्यामुळे अधिकारी सभागृहात आणि मंत्री बंद खोलीत, असे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पहायला मिळाले़उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक होणार होती़ बैठकीची वेळ १० वाजेची होती़ पवारही वेळेचे पक्के असल्याने जवळपास सर्वच विभागाचे प्रमुख फायली घेऊन वेळेवर हजर होते़ मात्र नियोजित वेळेच्या पाऊणतास आधीच पवार दाखल झाले़ पवार यांचे आगमन झाले़ त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मोजकेच अधिकारी उपस्थित होते़ उपमुख्यमंत्री पवार कार्यालयात आल्याचा निरोप मिळताच जिल्हाधिकारी कवडे घाई-घाईत हजर झाले़ त्यांच्या पाठोपाठ पालकमंत्र्यांसह पदाधिकारीही आले़ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्ह्यातील टंचाईची माहिती घेतली़ ही बैठक सुरू असतानाच शहरातील कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली़ पुष्पगुच्छ घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले़ काहींनी पोलिसांशी हुज्जत घालून प्रवेश मिळविला़ पण पवार अॅन्टी चेंबरमध्ये बंद खोलीत अधिकाऱ्यांना सूचना देत होते़ त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून यावेळी फेस टू फेस चर्चा केली़ शहरातील बाह्यवळण रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याचे काहींनी सांगितले़ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह महापौर संग्राम जगताप बैठकीस आवर्जून उपस्थित होते़ (प्रतिनिधी)नेते विश्रामगृहावर ...उपमुख्यमंत्री पवार औरंगाबाद महामार्गावरील शासकीय विश्रामगृहात येणार होते़ तेथून १० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेणार होते़ नियोजित दौरा असल्याने सर्व अधिकारी व पदाधिकारी विश्रामगृहावर सकाळीच दाखल झाले़ परंतु पुणे मार्गे कारमधून पवार आले़ विश्रामगृहावर न जाता ९़२० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि आढावा बैठकीपूर्वीच टंचाईबाबत त्यांनी बंद खोलीत बैठक घेतली़ वेळेपूर्वीच पवार दाखल झाल्याने सर्वांची धावपळ उडाली़राठोड यांना पवारांचे निमंत्रणउपमुख्यमंत्री पवार यांचे वाहन अडविणार असल्याचा इशारा आ़ अनिल राठोड यांनी गुरुवारी दिला होता़ त्यामुळे पवार यांनी सकाळी आल्यानंतर लगेच राठोड यांना भेटीचे निमंत्रण धाडले़ परंतु राठोड यांनी सकाळी येण्यास नकार दिला़ त्यांचा हा नकार का, यावरच बैठकीत काहीवेळ चर्चा रंगली होती़
जिल्हाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा
By admin | Updated: July 5, 2014 00:29 IST