तळेगाव दिघे : एका कार्यक्रमानिमित्त घरी सहकुटुंब जेवणास बोलावलेल्या विवाहितेवर दिरानेच अत्याचार केल्याची घटना चिंचोली गुरव (ता. संगमनेर) येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या दिरास १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चिंचोली गुरव येथील आरोपीच्या घरी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त जेवणावळ ठेवण्यात आली होती. संबंधित आरोपी हा पीडितेचा चुलत दीर असून, या कार्यक्रमास पीडित विवाहिता तिच्या कुटुंबासह गेली होती. फिर्यादी महिला जेवण वाढीत असताना जेवणावळीचे ठिकाण स्वच्छ करण्यासाठी जाऊबाईंनी तिला झाडू आणण्यासाठी घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत पाठवले होते. दरम्यान, आरोपी देखील तिच्या मागोमाग गेला आणि खोलीला आतून कडी लावून विवाहितेवर अत्याचार केला. त्यानंतर 'मी रात्री येईन, त्यावेळी तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवत जा, नाहीतर तुला पाहून घेईन. आता खाली गेल्यावर तू तुझ्या बहिणीशी फोनवर बोलत होते, असे सांग,' अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी अटक करीत न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड अधिक तपास करीत आहेत.