नेवासा : नेवाशासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नी नेवासा-श्रीरामपूर मार्गावर खोलेश्वर गणपती चौकात तालुका भाजपाच्यावतीने मंगळवारी रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नेवासा-श्रीरामपूर मार्ग तासभर ठप्प झाला होता. नेवासा तालुका भाजप अध्यक्ष दिनकर गर्जे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे व भरपाईमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असून या प्रकरणाची चौकशी करुन शेतकर्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, मुळा कालवा आवर्तनातून गावतळे, बंधारे भरुन घ्यावे, टेलपर्यंत सर्वांना पाणी मिळावे, टंचाई बैठकीचे आयोजन करावे, आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले. दिनकर गर्जे, शहराध्यक्ष संदीप आलवणे,अजित फाटके, रामभाऊ खंडाळे, बाळासाहेब कुलकर्णी यांची भाषणे झाली. लेखी आश्वासन मागण्यासंदर्भात प्रत्यक्ष कारवाई करण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार बडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी निकम, मुळा पाटबंधारे खात्याचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
विविधप्रश्नी रास्तारोको
By admin | Updated: October 23, 2024 13:31 IST