धनगर समाजात संभ्रम : भाजप करणार कोंडी, मुंबई-चौंडीतील शक्ती प्रदर्शनाबाबत उत्सुकतासुधीर लंके ल्ल अहमदनगरराष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी अहिल्याबाई होळकर यांची जयंती चौंडीऐवजी मुंबईत साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने धनगर समाजात संभ्रमाची अवस्था आहे. जानकरांचे हे पाऊल भाजपच्या हिताचे असून भाजप आता गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना बळ देऊन जानकर यांची आणखी कोंडी करेल, असेही बोलले जाते. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीत महादेव जानकर हे मागील वीस वर्षे जयंती उत्सव साजरा करत आलेले आहेत. त्यांच्यासह अनेक धनगर नेत्यांचे राजकारण येथूनच बहरले. ३१ मे २००३ रोजी अहिल्याबार्इंच्या जयंतीदिनी चौंडीतच जानकरांनी आपला राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. गोपीनाथ मुंडे यांनी जशी वंजारी समाजाला बीड व नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवरील भगवान गडावरुन सत्तेची स्वप्ने दाखविली, त्याच धर्तीवर ‘चौंडीमार्गे आपण मुंबई गाठू’, असे जानकर धनगर समाजाला सातत्याने सांगत आले. मात्र, अचानक जानकर यांनी चौंडीहून आपला मुक्काम मुंबईला हलविला आहे. त्यांच्या या निर्णयावर धनगर समाजातच मोठी चर्चा आहे. चौंडीला सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व असल्याने धनगर समाज येथे एका श्रद्धेपोटी जमा होतो. आता चौंडीत थांबायचे की मुंबईला जायचे? असा पेच समाजासमोर ओढावला आहे. यात समाजाची विभागणी होणार आहे. अहिल्यादेवींचे वंशज व चौंडीचे रहिवाशी असलेले प्रा. राम शिंदे हे सरकारमध्ये सध्या गृहराज्यमंत्री आहेत. शिंदे यांच्या रुपाने धनगर समाजाचा प्रतिनिधी आपल्याकडे असल्याने भाजप जानकर यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही, अशी एक शक्यता आहे. भाजपने जानकर यांना विधानपरिषदेवर पाठविले. मात्र, ते भाजपच्या कोट्यातून. जानकर यांचा स्वत:चा पक्ष असताना त्यांचे नाव भाजप आमदारांच्या यादीत दिसते. भाजप कोंडी करत असल्यामुळेच त्यांनी मुंबईत ही स्वतंत्र चूल मांडली आहे. धनगर समाज हा भाजपच्या नव्हे तर आपल्या पाठिशी आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, जानकर यांनी मुंबईकडे मोर्चा वळवल्याने प्रा. शिंदे यांनीही समाजावर आपली पकड मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. यापूर्वी जानकर हे चौंडीत मुख्य आयोजकाच्या भूमिकेत असायचे. ती भूमिका यावर्षी शिंदे बजावत आहेत. तेही शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. शासकीय कार्यालयांत जयंती महोत्सव साजरा करण्याचा शासन आदेश यावेळी प्रथमच काढण्यात आला. जयंती समारंभासाठी चौंडीला राज्यातून विविध ठिकाणांहून एस.टी. बसेस सोडण्याची व्यवस्थाही यावर्षी प्रथमच करण्यात आली आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबार्इंचे नाव देण्याचे सूतोवाचही शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत समाजातील नेत्यांची आरक्षणप्रश्नी बैठकही नुकतीच घडवून आणली. धनगर समाजासाठी आणखी एक महामंडळ निर्माण करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. जानकर यांच्यासाठीचा पर्याय म्हणून भाजप शिंदे यांना बळ देईल, अशीही शक्यता आहे. जानकर व शिंदे या दोघांचीही प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. जानकरांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यास तो भाजपसाठीही मोठा इशारा ठरेल. यामुळे प्रा.शिंदेही शक्ती प्रदर्शन घडविण्याच्या तयारीत आहेत.माझा पक्ष धनगर समाजापुरता नाही : जानकरअहिल्यादेवींना चौंडीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना देशपातळीवर न्यावे, या उद्देशाने मुंबईत जयंती साजरी करत आहोत. ‘रासप’ पक्ष केवळ धनगर समाजापुरता मर्यादित नाही. अहिल्याबार्इंना केवळ धनगरवाडीतच का ठेवायचे? सर्व बहुजन समाज संघटीत करण्याचा आपला प्रयत्न आहे. रासपचा अध्यक्ष हा जैन समाजाचा आहे. ब्राम्हण, मराठा, मागासवर्गीय अशा सर्व समाजात आम्हाला जनाधार आहे. आमच्या पाठिशी किती जनता आहे, हे मुंबईत तपासणार आहोत, असे महादेव जानकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. तांत्रिक कारणांमुळे भाजपच्या कोट्यातून आमदार झालो, याचा अर्थ मी त्यांचा गुलाम नाही. पुढीलवेळी मुख्यमंत्री कोण होईल, हे ‘रासप’च ठरवेल, असेही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या आमचे श्रद्धास्थान असून त्यांचा जयंती महोत्सव चौंडीत अखंडपणे सुरू राहिला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. चौंडीत येणाऱ्या जनतेचे स्वागत करणे, ही अहिल्याबार्इंचा वंशज म्हणून आपली प्रारंभीपासूनची भूमिका आहे. चौंडीचे महत्त्व हे कुणा व्यक्तीभोवती केंद्रित नसून अहिल्याबाई व समाजाशी नाते कायम रहावे, हीच आपली भूमिका आहे. येथे सर्वांचे स्वागत आहे.- प्रा. राम शिंदे, गृहराज्यमंत्री.
जानकरांनी चौंडी का सोडली?
By admin | Updated: May 30, 2016 23:52 IST