अहमदनगर डिबेट व पीस फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृतीनिमित्त ‘सत्तेचा विषाणू लोकशाहीला जगू देईल का?’ या विषयावर आयोजित प्रबोधन उपक्रमात सरोदे बोलत होते. रविवारी येथील कॅफे फरहत येथे हा कार्यक्रम झाला. सरोदे म्हणाले, सरकारी संस्था व यंत्रणेत अनेक जण प्रामाणिक काम करत असले तरी बहुतांशी जण दबावाखाली काम करत असावेत. सरकारी यंत्रणांचा पाहिजे तसा वापर करण्यासाठी पाळीव कळप तयार करण्याची सुरू झालेली मोहीम आत्मघातकी वळणावर आहे. न्यायाची पणती विझविणारे हात व त्यामागची डोकी आता लोकांना दिसायला लागली आहेत. राजकीय श्रद्धा जर एखादा पक्ष, विशिष्ट नेते यांच्या पायाशी लोळण घेत राहिल्या तर लोकशाहीतील नागरिक म्हणून आपण विकसित समाजाकडे जाणे कठीण होत जाईल, असे सरोदे यांनी सांगितले.
अहमदनगर डिबेटचे आयोजक अर्शद शेख म्हणाले, आजची राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक चळवळीचा रेटा वाढवावा लागेल. लोकांनी लोकशाहीसाठी संवेदनशील व्हावे. एका कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोधात बोलण्यापेक्षा किंवा कुणाची बाजू घेण्यापेक्षा जो योग्य असेल त्याची बाजू घेणारे प्रगल्भ नागरिक तयार होणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन बोधी रामटेके यांनी केले. अनुला सोनवणे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला.
फोटो - असीम सरोदे
ओळी- अहमदनगर डिबेट व पीस फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केले. समवेत अर्शद शेख, ॲड. श्याम असावा.