अहमदनगर : फळांंना चांगला दर मिळवण्यासाठी त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे असते. आता या प्रतवारीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरता येणार आहे. या प्रतवारीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लोणी (जि. अहमदनगर) येथील महाविद्यालयाचे प्रा. अशोक कानडे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ आणि ‘फ्रूट सॉर्टर’ अशी दोन यंत्रे विकसित केली असून फळे किती पिकली आहेत यानुसार त्यांची प्रतवारी करता येते. या संशोधनासाठी त्यांना विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्रा. कानडे यांनी हे संशोधन पेरू फळाविषयी केले आहे. हे संशोधन इतर फळांसाठी लाभदायी ठरू शकते. या यंत्राच्या साहाय्याने फळ विक्रेत्यांना फळाची पक्वता व गुणवत्ता समजू शकते. त्यामुळे या तंत्राचा व्यवहारात उपयोग शक्य आहे, असे मत संशोधक प्रा. अशोक कानडे यांनी व्यक्त केले. प्रा. कानडे हे राहता तालुक्यातील लोणी येथे पी. व्ही. पी. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात कार्यरत आहेत. या यंत्रांचा शोध लावल्यावर त्याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे. या संशोधनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व इलेक्टॉनिक सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी मार्गदर्शन केले.पेरू फळाच्या वर्गीकरणासाठी आणि प्रतवारी करण्यासाठी या यंत्रांचा वापर करता येतो. या यंत्रांना ‘मेटल आॅक्साइड सेमिकंडक्टर सेन्सर’ असे म्हटले आहे. याबाबत डॉ. शाळीग्राम यांनी सांगितले की, स्थानिक शेतक-यांच्या गरजांचा अभ्यास करून प्रा. कानडे यांनी हे तंत्रज्ञान शोधले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पेरूसह इतर फळ उत्पादकांनाही या यंत्रांच्या सहाय्याने चांगल्या प्रतीची फळे बाजारपेठेत पाठवता येतील. योग्य पद्धतीने वर्गीकरण झाल्याने दर त्यानुसार देता येतील आणि फ्रुट सॉर्टरमुळे फळाच्या आतमधील किड किंवा तत्सम प्रकार समोर येतील. त्यामुळेही चांगल्या दजार्चे कीड विरहित फळ देता आल्याने दर उत्तम मिळू शकेल. एकूणच शेतक-यांना आपल्या फलोत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी हे सहाय्यक पाऊल ठरेल. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लोकहिताचा विचार करून वेगळा प्रयत्न यशस्वी करून दाखविला आहे. याचा अभिमान वाटतो.संशोधनाचे ठळक मुद्दे :‘इलेक्ट्रॉनिक नोज यूसिंग मेटल आॅक्साईड सेमीकंडक्टर सेन्सर्स फॉर द क्लासिफिकेशन अँड ग्रेडिंग आॅफ गावा फ्रूट’ या विषयावर प्रा. कानडे यांनी पुणे विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली.‘आॅटोमॅटिक मशीन व्हिजन बेस्ड फ्रुट सॉर्टर’ या मशिनमुळे मानवी मर्यादा टाळून वर्गीकरण केले जाते. आतापर्यंत एखादी व्यक्ती ही वर्गीकरण फळ बघून करतात. पण या यंत्रामुळे निर्दोष वर्गीकरण व त्यामध्ये अचूकता राहिल.‘इलेक्ट्रॉनिक नोज’ हे माणसाप्रमाणे वास ओळखून फळ किती पिकले आहे त्यानुसार प्रतवारी सांगते. प्रत्यक्ष माणूस वास घेऊन फळ पिकले आहे की नाही हे फार वेळ बरोबर ओळखू शकत नाही. कारण सतत वास घेतल्याने काही वेळाने प्रतवारी अचूक सांगणे शक्य होत नाही. मात्र यांत्रिक पद्धतीने कमी वेळात अधिक फळांची अचूक प्रतवारी करणे शक्य आहे.
राहाता तालुक्यातील प्राध्यापकाकडून फळांच्या प्रतवारीसाठी तंत्रज्ञान विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:30 IST
फळांंना चांगला दर मिळवण्यासाठी त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे असते. आता या प्रतवारीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरता येणार आहे.
राहाता तालुक्यातील प्राध्यापकाकडून फळांच्या प्रतवारीसाठी तंत्रज्ञान विकसित
ठळक मुद्दे प्रा. अशोक कानडे यांना विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान