श्रीरामपूर : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीचे श्रीरामपूर येथील उपअभियंता प्रल्हाद टाक यांना कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे; मात्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती लपविली. अखेर मंत्री तनपुरे यांनीच स्वतः कारवाईची माहिती माध्यमांना दिली.
मंत्री तनपुरे हे शुक्रवारी महावितरणच्या विभागीय कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी महावितरणचे भोकर उपकेंद्राचे उपअभियंता टाक यांच्याविरोधात तक्रारींचा भडीमार केला. शेतकऱ्यांनी फिडर दुरुस्तीच्या केलेल्या मागणीकडे अधिकारी टाक यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकाराची दखल घेत मंत्री तनपुरे यांनी टाक यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी टाक यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.
दरम्यान, दोन दिवसानंतरही या कारवाईची माहिती दडवून ठेवण्यात आली. सोमवारी मंत्री तनपुरे यांनी स्वतः कारवाईबाबत माहिती दिली. महावितरणच्या कार्यालयात शुक्रवारी मंत्री तनपुरे यांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सरकारी यंत्रणेकडून तशी माहिती माध्यमांना देण्यात आली होती; मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेबाबत कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही. त्यामुळे या उपअभियंत्यावरील कारवाईची कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती.