अकोले : दिंडी पताका, टाळ मृदुंग व विठूनामाच्या जयघोषाने अगस्तींची अकोले नगरी दुमदुमली अन् महर्षी अगस्तीऋषी पायी दिंडीचे गुरुवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्तान झाले.अगस्ती आगारात उद्योजक नितीन गोडसे यांनी अगस्तींची पूजा केल्यानंतर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पंधरा दिवसांच्या प्रवासानंतर संगमनेर, राहुरी, नगर, करमाळामार्गे ही दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी दहा झाडे लावण्याची दिंडीची प्रथा असून दिंडीसोबत फिरते शौचालय असते. व्यसन मुक्तीचा व स्वच्छतेचा संदेश देत, भक्तीरसात डुंबत ही दिंडी निघाली असल्याचे जिल्हा दारुबंदी प्रबोधन समितीचे प्रमुख दीपक महाराज देशमुख यांनी दिंडी प्रस्थान प्रसंगी स्पष्ट केले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अगस्ती देवस्थानचे सचिव सुधाकर शालीग्राम, आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे, दिंडीप्रमुख राजेंद्र महाराज नवले, विवेक महाराज केदार, विष्णू महाराज वाकचौरे, किसनशेठ लहामगे, बद्रीशेठ मुंदडा, गुलाबराव शेवाळे, व्यवस्थापक रामनाथ मुतडक, रावसाहेब वाकचौरे, सुधाकर देशमुख, विठ्ठल मंदिर देवस्थानचे सरचिटणीस हेमंत आवारी, सुभाष नवले, शांताराम नवले, शांताराम संगारे आदी यावेळी उपस्थित होते.महात्मा फुले चौकात रिंगण सोहळा पार पडला.(तालुका प्रतिनिधी)
अगस्तीऋषी दिंडीचे अकोल्यातून प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:31 IST