अहमदनगर : शेतीमाल बाजार समित्यांच्या नियमानातून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शहरासह आडते व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली़ दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्ह्यातील फळे व भाजीपाला विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापनेच्या सूचना संबंधितांना केल्या़फळे व भाजीपाला बाजार समितीच्या नियमातून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ सरकारच्या या निर्णयाचा शहरासह जिल्ह्यातील आडते व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला़ नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बैठक घेऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ कांदा आडतदार भाजीपाला फळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल झंवर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले़ शिष्टमंडळात संतोष सूर्यवंशी, निखिल वारे आदींचा समावेश होता़ यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, सन १९७२ पासून १० टक्के आडत घेत होते़ शेतीमाल विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आल्यानंतर आडतीचा ६ टक्के झाला़ सध्या व्यापारी या दरानेच आडत वसूल करतात़ त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या मालाचा योग्य भाव आणि पैशाची हमी समिती देते़ असे असताना सरकारने शेतीमाल नियमन मुक्त करण्याचा निर्णय घेतला़ नियमनमुक्ती म्हणजे बाहेर माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बंधन नाही़ याचाच अर्थ मुक्त बाजारामुळे पिढ्यान् पिढ्या व्यापार करणारे बेघर होतील़ त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल़ त्यामुळे हा नियमनमुक्ती कायदा कृषी बाजार समितीतील आवरात व्यापार करणाऱ्यांसाठी लागू करावा़ जेणेकरून बाहेरच्या व्यापाऱ्यांशी स्पर्धा करता येईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनात घोडेगाव, वांबोरी, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, पारनेर, शेवगाव, तिसगाव, संगमनेर येथील कडबा व्यापारी आदींचा समावेश होता़(प्रतिनिधी)उपाययोजना करण्याच्या सूचनानिवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहायक उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस उपधीक्षक, प्रादेशिक परिवन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली़ बैठकीत जिल्ह्यातील नगर, राहुरी, राहाता, श्रीगोंदा, कर्जत येथील बाजार समित्या सुरू असल्याचे सांगण्यात आले़ तर जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी येथील बाजार समितीचा कारभार बंद आहे़ संगमनेर व अकोले येथील भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या़
आडते व्यापाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By admin | Updated: July 11, 2016 23:53 IST