रवींद्र अशोक रोडे (रा.अंबड, जि. जालना) हा तरुण सध्या नोकरीनिमित्त राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात माजी नगरसेवक अशोक तनपुरे यांच्या खोलीत भाडोत्री राहत आहे. ७ जुलै रोजी रात्री त्याने त्याची मोटारसायकल अशोक तनपुरे यांच्या घराजवळील पार्किंगमध्ये लावली होती. रात्रीच्या दरम्यान ती मोटारसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली होती. दुसऱ्या दिवशी मोटारसायकल मालक रवींद्र रोडे याला अनोळखी नंबरवरून फोन आला. मोटारसायकल परत पाहिजे असेल तर १५ हजार रुपये द्यावे लागतील. रोख रक्कम घेऊन स्टेट बँकेजवळ ये, असे सांगितले. रवींद्र रोडे याने त्वरित अशोक तनपुरे यांना घटनेची माहिती दिली. अशोक तनपुरे यांनी काही तरुण बरोबर घेऊन स्टेट बँकेसमोर त्या तरुणाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केली.
रवींद्र रोडे याच्या फिर्यादीवरून अनिस नजीर सय्यद (रा. बुरुड गल्ली, राहुरी) गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कारेगावकर हे करीत आहेत.