अहमदनगर : बाह्यवळण रस्त्यावरील पाच ठिकाणच्या चौकात अपघाताने अनेकांचा जीव जातो आहे. सदर चौकात सिग्नल बसविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. सदर चौकात सिग्नल न बसविल्यास २९ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संघटनेच्या वतीने वाहतूक अनागोंदीचा निषेध करण्यात येणार आहे. या चौकात बोंबा मारून प्रशासनाच्या विरोधात शिमगा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. बाह्यवळण रस्ता होऊन अनेक वर्षे झाली. या रस्त्यावरून अनेक अवजड वाहने सुसाट वेगाने जातात. अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. केडगाव, नेप्ती, एमआयडीसी दूधडेअरी, विळद चौफुला, शेंडी रोड या पाच ठिकाणच्या चौकात सिग्नलची गरज आहे. बाह्यवळण रस्त्यावरील पाच ठिकाणी असलेल्या चौकात त्वरित सिग्नल बसविण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे, मात्र प्रशासन कार्यवाही करीत नसल्याचे दिसते आहे, असे गवळी यांनी पत्रकात म्हटले आहे.
--
फोटो- १४ सिग्नल