नुकत्याच झालेल्या सभेत नगराध्यक्षा आदिक यांनी विरोधी नगरसेवकांच्या बांधकामांवरून टीका केली होती. त्याला फंड व बिहाणी यांनी उत्तर दिले आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक शहराची विकास कामे न करता सभेत वैयक्तीक आरोपाचा अजेंडा राबवत आहेत. चार वर्षाच्या कालावधीत नगराध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारुन पूर्ण केली. परंतु अजूनही त्यांचा पालिकेच्या कामांचा अभ्यास झालेला नाही. श्रीरामपूरच्या जनतेचे कामांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी व अयोग्य कारभार झाकण्यासाठी त्या वैयक्तीक आरोप करीत आहेत, अशी टीका बिहाणी व फंड यांनी केली आहे.
विरोधी नगरसेवकांचे उणेदुणे काढणे, खोटे आरोप करणे यामध्ये नगराध्यक्षा आदिक धन्यता मानत आहेत. त्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाच्या आरोपात तथ्य नाही. रितसर परवानगी घेऊनच बांधकामे करण्यात आली आहेत. नगररचना विभागाने प्लानमध्ये काही बदल सुचविले होते. त्यामुळे स्वत:हून बांधकाम पाडून नव्याने सुरू केले, असा खुलासा त्यांनी केला.
नगराध्यक्षा आदिक यांनी काही लोकांना हाताशी धरुन नगरसेवकपदावरून अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र त्यात तथ्य नसल्याने फेटाळण्यात आल्या. शहरातील नागरीकांचे पिण्याचे शुध्द पाणी, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्याचे प्रश्न, या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
---------
बांधकामे बेकायदेशीरच
कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेले बांधकाम रात्रीतून का पाडले? अशी टीका नगराध्यक्षा आदिक समर्थक रईस जहागीरदार यांनी केली आहे. नगराध्यक्षा आदिक यांनी शहरात कुठेही जागा खरेदी केली नाही. कुठेही जागा हडप केली नाही. उलट विरोधकांनी २५ वर्षांमध्ये शहराचे मोठे नुकसान केले, अशी टीका जहागीरदार यांनी केली आहे.