फिर्यादीत तिने म्हटले आहे की, माझी व्हाॅटसॲपद्वारे एका मुलाशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यातून त्याने माझ्याकडे बळजबरीने काही अश्लील फोटो मागवून घेतले. त्यानंतर त्याने पुन्हा अश्लील फोटोची मागणी केली; परंतु त्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा माझे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. याबाबत पोलिसांनी तांत्रिक माहिती काढली असता, आरोपी हा शेलुखडसे (ता. रिसोड, जि. वाशिम) येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणी तपास पथक रवाना करून रिसोड पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने त्याच्या मोबाइल व मित्राच्या मोबाइलवरून मुलीस अश्लीस संदेश पाठविल्याचे तसेच तिचे फोटो इंन्स्टाग्रामवर अपलोड केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल संजय शिरसाठ व विशाल सदानंद साबळे यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याकडे असून, त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
अश्लील फोटोतून बदनामी करणारा अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST