लोणी ते नांदूरशिंगोटे डांबरी रस्त्यादरम्यान तळेगाव दिघे अमरधामनजीकच्या ओढ्यावरील छोटा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. सदर पुलास संरक्षक कठडे नसल्याने अनेक वाहनचालकांना अपघाती वळण रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने ओढ्यात कोसळतात. तळेगाव अमरधाम ते सिद्धेश्वर मंदिरदरम्यानचा वळण रस्ता (सी-टर्न) अपघातास कारणीभूत ठरत आहे. या डांबरी रस्त्यावरून रहदारी वाढल्याने या परिसरात अनेकदा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अपघातप्रवण वळण रस्ता परिसरात रस्ता रुंदीकरण व पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी युवक कार्यकर्ते अमोल बाळासाहेब दिघे यांनी केली आहे. याप्रश्नी राष्ट्रीय महामार्ग, नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनावर ६० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मागणीची दखल न घेतल्यास व अपघात व जीवितहानी झाल्यास राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहील, असा इशाराही अमोल दिघे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
........
फोटो : तळेगाव दिघे
अपघाती वळण रस्त्याची व पुलाची दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना देताना अमोल दिघे. समवेत कार्यकर्ते.